मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील भागडी जि.प.शाळेने शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत शाळेची विद्यार्थिनी आदिती गोविंद आगळे हिने उल्लेखनीय कामगिरी करत ३०० पैकी २५० गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. त्याच बरोबर स्वरा उदय आगळे व देविका देविदास थिटे या उत्तम गुणांनी पात्र ठरल्या आहेत.त्यांच्या या यशामुळे भागडी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना मिळते. या परीक्षेत आदिती,स्वरा व देविका यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले. त्यांच्याच्या या यशाची माहिती शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब गिलबिले यांनी दिली.
आदिती,स्वरा व देविका यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी तिचे वर्गशिक्षक दत्तात्रय रामहरी आहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. नियमित सराव, प्रश्नपत्रिकांचा अभ्यास, संकल्पनांचे आकलन तसेच वेळेचे योग्य नियोजन यामुळे तिघींनाही परीक्षेत उत्तम कामगिरी करता आली. तिच्या मेहनतीचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे हे यशस्वी फलित असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.सुरेखा जाधव,स्वाती शिंदे,लालन गायकवाड या शिक्षकांचे देखील मोलाचे मार्गदर्शन तिला लाभले.
आदितीच्या या यशाबद्दल भागडी गावचे सरपंच गोपाळ गवारी, उपसरपंच लताताई उंडे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वैभव उंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ तसेच शिक्षकवृंद यांनी तिचे अभिनंदन केले. आदितीच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वांनी तिला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवू शकते, हे आदितीने आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे. तिच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रेरणा मिळाली असून, भागडी शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.





