spot_img
spot_img
spot_img

खड्ड्यांतूनच दत्तदर्शन! सौरंगा दत्तमंदिराच्या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष एक खड्डा चुकवताना दुसऱ्या खड्ड्यात वाहन आदळते; भाविकांसह ग्रामस्थांचा संताप

 

मंचर प्रतिनिधी 

आंबेगाव व खेड तालुक्यांच्या सीमावर्ती भागातील श्रद्धास्थान असलेल्या सौरंगा दत्तमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची पावसामुळे अक्षरशः चाळण झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने ग्रामस्थ व भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. “खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या रस्त्यावरून दररोज शेकडो दुचाकी व चारचाकी वाहने ये-जा करतात. मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. एक खड्डा चुकवताना दुसऱ्या खड्ड्यात वाहन आदळत असल्याने वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढला आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच दूरवरून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या खराब रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

अरुंद रस्ता आणि चुकीच्या गटारांमुळे धोका

सौरंगा दत्तमंदिराकडे जाणारा रस्ता अनेक ठिकाणी अरुंद व एकेरी स्वरूपाचा आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारांचीही योग्य व्यवस्था नसल्याने वाहन घसरण्याची किंवा रस्त्याच्या कडेला जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यक्रम, यात्रा व विशेष दिवसांच्या वेळी भाविकांची गर्दी वाढत असल्याने ही समस्या अधिक गंभीर होते.

बुजवलेले खड्डे पुन्हा उघडे

यापूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठेकेदारामार्फत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे हे खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. त्यामुळे तात्पुरती डागडुजी न करता रस्त्याची कायमस्वरूपी व दर्जेदार दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जबाबदारी निश्चित करण्याची मागणी

सौरंगा दत्तमंदिर परिसर खेड व आंबेगाव तालुक्यांच्या सीमावर्ती भागात असल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्नही ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच दोन्ही तालुक्यांतील लोकप्रतिनिधींनी संयुक्त पाहणी करून रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.

“देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना खड्ड्यांतून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे.

सौरंगा दत्तमंदिर हे भाविकांच्या श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र असल्याने मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. भाविक व ग्रामस्थांना खड्ड्यांच्या त्रासातून मुक्त करावे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाला थेट सवाल

“दत्तदर्शनासाठी खड्ड्यांतून प्रवास किती दिवस? सौरंगा मंदिराचा रस्ता तातडीने दुरुस्त करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज तळेकर यांनी केली आहे

Related Articles

ताज्या बातम्या