मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, तालुक्याच्या आदिवासी भागातील अनेक रस्ते वाहून गेले आहेत. काही ठिकाणी रस्ते वाहून जाऊन बराच कालावधी उलटूनही त्यांची डागडुजी करण्यात आलेली नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तालुक्यात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असून, काही कामांचा दर्जा समाधानकारक नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. संबंधित ठेकेदारांकडून कामाचा दर्जा राखला जात नसल्याने पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत समाजमाध्यमांवरून अनेकदा आवाज उठवूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी दळणवळणाची सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे. खराब रस्त्यांमुळे शेतीमालाची वाहतूक, दूध वाहतूक तसेच दैनंदिन प्रवासात अडथळे निर्माण होत आहेत. अनेक गावांतील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांची पाहणी करून तातडीने डागडुजी करावी तसेच सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा दर्जा तपासावा. लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्वसामान्य नागरिकांचा रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.





