मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात डिझेल चोरीच्या घटनांनंतर आता चोरट्यांनी विद्युत तारांकडे मोर्चा वळविल्याने महावितरणसह विद्युत ठेकेदारांची चिंता वाढली आहे. एका बाजूला वनविभागाच्या परवानग्या व इतर अडचणी, तर दुसऱ्या बाजूला चोरट्यांचा उपद्रव, अशा दुहेरी संकटाचा सामना विद्युत काम करणाऱ्या ठेकेदारांना करावा लागत आहे.
लोणी ( ता . आंबेगाव ) येथील वीज उपकेंद्रावरून मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथे वीजपुरवठा करण्यासाठी वडगावपीर येथील बैलगाडा घाटापासून ढगेवस्तीपर्यंत विद्युत पोल उभारण्यात आले आहेत. या पोलवरून हायटेंशन विद्युत तारा ओढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले होते. त्यामुळे लवकरच मांदळेवाडी परिसरातील वीजपुरवठा सुरळीत होणार, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती.
मात्र, शनिवार ( दि. २२) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी जवळपास दहा विद्युत पोलवरील विद्युत तारा काढून चोरून नेल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे महावितरणबरोबरच संबंधित विद्युत ठेकेदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, वीजपुरवठ्याचे कामही रखडले आहे.
याबाबत सरपंच उज्वला आदक व उपसरपंच रवि ढगे पाटील यांनी सांगितले की, विद्युत तारा ओढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले होते. लवकरच लोणी येथून मांदळेवाडीला वीजपुरवठा सुरू होणार होता. मात्र, चोरट्यांनी विद्युत तारा चोरून नेल्याने कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
विद्युत साहित्याची चोरी करणाऱ्या चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच परिसरातील विद्युत कामांना सुरक्षा मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.





