मंचर प्रतिनिधी:
धामणी ( ता . आंबेगाव ) येथील गाढवे मळा परिसरात अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावत असलेल्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. परिसरात १०० केव्ही क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आल्याने घरगुती वीजपुरवठा सुरळीत झाला असून शेतकऱ्यांच्या मोटारपंपांनाही पुरेशा दाबाने वीज मिळू लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत सदस्य प्रतिक जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागल्याची माहिती अशिष गाढवे यांनी दिली.
गाढवे मळा परिसरात यापूर्वी अपुऱ्या क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरमुळे वारंवार कमी दाबाचा वीजपुरवठा होत होता. परिणामी घरातील विद्युत उपकरणे व्यवस्थित चालत नव्हती. तसेच शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारपंप पूर्ण क्षमतेने सुरू होत नसल्याने शेतीच्या कामांवर परिणाम होत होता. नवीन १०० केव्ही ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्यानंतर वीजपुरवठ्यात लक्षणीय सुधारणा झाली असून नागरिक व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी धामणीचे लोकनियुक्त सरपंच प्रतीक्षा राजेंद्र जाधव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंबेगाव तालुका सरचिटणीस भाऊसाहेब करंडे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर देविदास करंजखेले, वि.वि.का. सोसायटीचे तज्ज्ञ संचालक सदाशिव गाढवे, किरण गाढवे, दिनकर गाढवे, सुनील गाढवे, लक्ष्मण गाढवे, हर्षद गाढवे, अनिता गाढवे, माया गाढवे, छाया गाढवे तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी वीज समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व संबंधितांचे आभार व्यक्त केले. तसेच भविष्यातही गावाच्या विकासासाठी अशाच प्रकारे लोकहिताची विकासकामे राबविण्यात यावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.





