spot_img
spot_img
spot_img

पावसाअभावी शिरदाळे परिसरातील बटाटा पीक करपले उत्पन्नाचे प्रमुख साधन धोक्यात; पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

 

मंचर प्रतिनिधी :

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरदाळे परिसरात पावसाने गेल्या महिनाभरापासून दडी मारल्याने पावसाळी बटाटा पिकाला मोठा फटका बसला आहे. पाण्याअभावी शेतातील बटाटा पीक करपू लागल्याने बटाटा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

शिरदाळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी साधारण दोन महिन्यांपूर्वी पावसाळी बटाटा पिकाची लागवड केली होती. मात्र, यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने बटाटा लागवडीवरही परिणाम झाला. लागवडीनंतर सुरुवातीला पाऊस झाल्याने पिकाची वाढ चांगली झाली होती. मात्र, गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे ओढ दिल्याने बटाटा पिकाला आवश्यक पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे.
शिरदाळे परिसर हा डोंगर-पठार भागात असून येथील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाने दडी मारल्यास खरीप पिकांसह बटाटा पिकावरही त्याचा थेट परिणाम होतो. सध्या शेतामध्ये बटाट्याची पाने सुकून करपू लागली असून पिकाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

बटाटा हे या परिसरातील शेतकऱ्यांना वर्षाचे महत्त्वाचे आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे पीक आहे. लागवडीसाठी बियाणे, खते, औषधे, मशागत व मजुरीवर मोठा खर्च झालेला असताना पावसाअभावी पीक धोक्यात आल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गणिते बिघडण्याची शक्यता आहे.

महसूल व कृषी विभागाने शिरदाळे परिसरातील बटाटा पिकाची तातडीने पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी बटाटा उत्पादक शेतकरी बाबाजी चौधरी राघू रनपिसे सचिन तांबे संदीप मिंडे सिद्धार्थ तांबे यांनी केली आहे 

Related Articles

ताज्या बातम्या