मंचर प्रतिनिधी
पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील आदर्श व्यक्तिमत्त्व कै. नाथा तुकाराम पोखरकर उर्फ नाथा दादा पोखरकर यांच्या सामाजिक व ग्रामविकासातील योगदानाची कायमस्वरूपी आठवण राहावी, यासाठी माऊली महाराज मंदिरासमोरील नूतन सभामंडपाला ‘कै. नाथा दादा पोखरकर सभामंडप’ असे नामकरण करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी एकमताने हा निर्णय घेतला.
कै. नाथा दादा पोखरकर यांनी पोंदेवाडी गावचे लागोपाठ १५ वर्षे सरपंच व उपसरपंच म्हणून काम पाहिले. आपल्या कार्यकाळात त्यांनी गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यासह ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. गावातील प्रत्येक व्यक्तीच्या सुख-दुःखात ते हिरीरीने सहभागी होत असत. कोणत्याही व्यक्तीला अडचण निर्माण झाल्यास मदतीसाठी ते तत्पर असायचे.
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही त्यांची ओळख होती. पदावर असतानाही त्यांनी सर्वसामान्यांशी जिव्हाळ्याचे संबंध जपले.
त्यांच्या निधनाने पोंदेवाडी गावाने एक सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व गमावले आहे.
त्यांनी गावासाठी केलेल्या कार्याची आणि ग्रामस्थांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण कायम राहावी, यासाठी माऊली महाराज मंदिरासमोरील सभामंडपाला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. या नामकरणामुळे कै. नाथा दादा पोखरकर यांच्या कार्याची स्मृती भावी पिढ्यांपर्यंत जपली जाणार आहे.





