spot_img
spot_img
spot_img

शिरदाळे येथे वृक्षरोपणाचा उपक्रम उत्साहात; तलाव परिसर हरित करण्याचा संकल्प

 

मंचर प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे येथे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ व समस्त ग्रामस्थांच्या वतीने रविवारी वृक्षरोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.गावालगत असलेल्या ऐतिहासिक तलाव परिसराचे सुशोभीकरण व पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

शिरदाळे गावाला लाभलेला ऐतिहासिक तलाव हा वर्षभर गावाच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविणारा महत्त्वाचा जलस्रोत आहे. या तलाव परिसराचे हरितीकरण  करून पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या हेतूने गावातील तरुणांनी पुढाकार घेत वृक्ष रोपणाचे नियोजन केले.

सदर कार्यक्रमास शिवऋण महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय बोऱ्हाडे, दैनिक सामनाचे उपसंपादक विठ्ठल  जाधव, हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठान अध्यक्ष बाबाजी चासकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव, धामणीचे माजी सरपंच सागर जाधव पाटील, पत्रकार अंकुश भुमकर तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित प्रत्येक मान्यवरांचा वृक्षरोप भेट देऊन सन्मान करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.यावेळी धामणी येथील खंडोबाच्या मूळस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सागदरा परिसरातील विकास कामाचाही गौरव करण्यात आला.

चंपाषष्ठी उत्सव व यात्राकाळात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची ये-जा होत असते. मात्र हा भाग खोल दरीत असल्याने भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन गावातील ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेत तरुण आणि महिलांच्या सहकार्याने सागदरा येथे सुरक्षित व सुबक रस्ता तयार केल्याचे संदीप तांबे यांनी सांगितले

या सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या सर्वांचा कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे हा वृक्षरोपण व सत्कार सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

पर्यावरण संवर्धनाबरोबरच सामाजिक एकोप्याचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांनी कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त केली.

Related Articles

ताज्या बातम्या