मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक येथील घोडनदीच्या पात्रात असलेल्या साडेतीनशे वर्षे जुन्या पुरातन महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर कलशारोहण सोहळा ह.भ.प. पांडुरंग महाराज येवले यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.
यावेळी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.
काठापूर बुद्रुक येथील घोडनदीच्या पात्रात ऐतिहासिक महादेव मंदिर आहे. या मंदिराचा कलश मागील अनेक वर्षांपासून खंडित झाल्याने मंदिराच्या जीर्णोद्धाराची गरज निर्माण झाली होती. ग्रामस्थांनी एकत्र येत पुढाकार घेऊन मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण केला.
त्यानंतर नव्याने उभारलेल्या मंदिराचा कलशारोहण सोहळा धार्मिक वातावरणात पार पडला.
या सोहळ्यावेळी ह.भ.प. जालिंदर महाराज करंडे यांची प्रवचन सेवा झाली. विविध धार्मिक विधी व कार्यक्रमांमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम, उद्योजक रमेश येवले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे, पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, बाळासाहेब घुले, सरपंच अशोक करंडे, काठापूर खुर्दच्या सरपंच सीमा थिटे, माजी सरपंच रघुनाथ करंडे, बाळशिराम करंडे, पोलीस पाटील अमोल करंडे यांच्यासह ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काठापूर बुद्रुक गावाला ऐतिहासिक वारसा लाभला असून गावात अनेक पुरातन वास्तू व मंदिरे आहेत. होळकर काळात या परिसरातील अनेक वास्तू व मंदिरांची उभारणी झाल्याचे सांगितले जाते. घोडनदीच्या पात्रातील पुरातन महादेव मंदिराची कालांतराने पडझड झाली होती. त्यामुळे ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेत मंदिराचा जीर्णोद्धार केला.
या ऐतिहासिक मंदिराचे जतन व संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेल्या पुढाकाराचे उपस्थितांनी कौतुक केले.





