मंचर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सन २०२६ मध्ये राष्ट्रपुरुष व थोर व्यक्ती यांच्या जयंती तसेच राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत नवीन परिपत्रक जारी केले असून, त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

१५ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार २२ जुलै २०२६ (बुधवार) रोजी राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अजित पवार यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
परिपत्रकानुसार विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या प्रमुखांनी संबंधित कार्यक्रमाचे नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश शासनाने दिले आहेत. तसेच हे परिपत्रक राज्यातील सर्व महाविद्यालये आणि शाळांनाही लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि विविध विभागांमध्ये २२ जुलै रोजी अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.





