मंचर प्रतिनिधी
आंबेगावच्या पूर्व भागातील मेंगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, लाखणगाव आदी गावांतील अनेक शेतकऱ्यांनी फुल शेती केली आहे परंतु फुलांचे बाजारभाव पडल्याने फुल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे
वाळुंजनगर येथील फुल उत्पादक शेतकरी तानाजी वाळुंज व मेंगडेवाडी येथील फुल उत्पादक शेतकरी सागर रणपिसे यांनी दोन एकर शेतात मारब्ले या जातीची फुल लागवडी केली आहे
या दोन्ही शेतकऱ्यांची फुले तोडणीसाठी आली असून फुलांचा बाजारभाव पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे
वाळुंज यांनी दीड एकर क्षेत्रात कलींगड पिकात अप्सरा झेंडुचे आंतरपीक घेतले होते कलींगड पिकाला समाधानकारक भाव मिळाला परंतु झेंडु फुलाला अत्यल्प बाजारभाव मिळत असल्याने झेंडुचा खर्च निघत नसल्याचे तानाजी वाळुंज यांनी सांगितले
फुलांचे कोसळलेले बाजारभाव, वाढते तापमान, उत्पादनातील घट आणि खराब होऊ लागलेली फुले यामुळे फुलउत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
दिवाळीनंतर सुरू होणारी लग्नसराई, विविध सण-उत्सवांमुळे फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे अल्पावधीत चांगले उत्पादन मिळत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर फुलशेती करतात. यंदाही अधिक बाजारभाव मिळतील, चांगले उत्पन्न होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी फुलांची लागवड केली होती. पिकाच्या वाढीसाठी खते, कीडनाशक फवारणी आणि मजुरीवर मोठा खर्चही करण्यात आला. मात्र यंदा ऐन हंगामात फुलांना मागणी घटली आहे. अचानक वाढलेल्या तापमानामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या फुलांच्या उत्पादनात जवळपास निम्मी घट झाली आहे. तसेच फुलांच्या पाकळ्या खराब होऊ लागल्याने बाजारभावही कोसळले आहेत. सध्या झेंडूला किलोमागे २० ते ३० रुपये, बिजलीला १० ते २० रुपये, शेवंतीला सुमारे १०० रुपये, आष्टरला ६० ते ७० रुपये भाव मिळत आहे
परिणामी, पिकासाठी केलेला खर्चही निघणे कठीण होत असल्याचे मेंगडेवाडी येथील फुल उत्पादक सागर रणपिसे यांनी सांगितले
“वाढत्या तापमानामुळे फुलांची प्रतही कमी झाली असून, फुले खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच सध्या परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने मागणी घटली आणि बाजारभाव कोसळल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे
जयेश वाळुंज – मोरया फर्टिलायझर लोणी, ता.आंबेगाव जिल्हा पुणे





