spot_img
spot_img
spot_img

जारकरवाडीत आषाढी बारशीनिमित्त भाविकांना महाप्रसाद; ग्रामस्थांच्या लोकसहभागातून अन्नदानाचा उपक्रम

 

मंचर प्रतिनिधी

जारकरवाडी ( ता. आंबेगाव ) येथील श्री पांडुरंग मंदिराच्या आवारात आषाढी बारशीनिमित्त भाविकांसाठी महाप्रसाद व अन्नदानाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ग्रामस्थांच्या लोकसहभागातून दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीनंतरच्या दुसऱ्या दिवशी हा धार्मिक व सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येतो.

या प्रसंगी सुमारे एक हजार ते पंधराशे भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. गावातील नागरिकांकडून देणगी तसेच अन्नधान्य स्वरूपात सहकार्य केले जाते. विशेष म्हणजे गावातील युवक एकत्र येऊन नियोजनापासून स्वयंपाक, महाप्रसाद वितरण आणि व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी पार पाडतात.

आषाढी वारीला पंढरपूर येथे प्रत्यक्ष जाऊ न शकणाऱ्या भाविकांसाठी जारकरवाडीतील श्री विठ्ठल मंदिर हेच ‘प्रती पंढरपूर’ मानले जाते. त्यामुळे परिसरातील अनेक भाविक मंदिरात दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतात. या उपक्रमामुळे धार्मिक परंपरेबरोबरच सामाजिक एकोपा आणि सेवाभावाची जपणूक होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडलेल्या या अन्नदान उपक्रमाचे भाविकांनी कौतुक केले.

Related Articles

ताज्या बातम्या