spot_img
spot_img
spot_img

दूध भेसळ प्रकरणातील १३ फरार आरोपींना तात्काळ अटक करा; दूध प्रकल्पांवरही कारवाईची मागणी देवदत्त निकम यांचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांना निवेदन

मंचर प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यात गाजत असलेल्या दूध भेसळ प्रकरणातील अद्याप फरार असलेल्या १३ आरोपींना तात्काळ अटक करावी तसेच भेसळयुक्त दूध स्वीकारून प्रक्रिया करणाऱ्या संबंधित दूध प्रकल्पांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.

निवेदनात दूध भेसळ प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संपूर्ण साखळीची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. भेसळ करणाऱ्या आरोपींसह भेसळयुक्त दूध स्वीकारून त्यावर प्रक्रिया करणाऱ्या संबंधित दूध प्रकल्पांचीही चौकशी करून त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका निकम यांनी मांडली.

दूध भेसळ हा केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून जनतेच्या आरोग्याशी थेट संबंधित गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे या प्रकरणातील कोणत्याही दोषीला पाठीशी न घालता सर्व संबंधितांवर निष्पक्ष व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंबेगाव तालुकाध्यक्ष विशाल वाबळे, शंकरराव टेमगिरे आणि विशाल भोर उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या