मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे येथे भटक्या कुत्र्यांच्या कळपाने माय-लेकावर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ( दि.१४) रोजी घडली. या हल्ल्यात रुपाली उत्तम रणपिसे आणि त्यांचा मुलगा शिवम उत्तम रणपिसे जखमी झाले आहेत. या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेहमी प्रमाणे रुपाली रणपिसे या मुलगा शिवम याच्यासह गोठ्यावर दूध काढण्यासाठी जात असताना रस्त्यात आठ ते दहा भटक्या कुत्र्यांचा कळप बसलेला होता. अचानक कुत्र्यांनी शिवमवर हल्ला केला. त्यावेळी आई रुपाली यांनी प्रसंगावधान राखत मुलाला उचलून सुरक्षित बाजूला ढकलले. त्यानंतर कुत्र्यांनी रुपाली रणपिसे यांच्यावर हल्ला करून त्यांच्या शरीराच्या विविध भागांवर चावे घेतले.
रुपाली यांनी आरडाओरड केल्यानंतर जवळच असलेले कांताराम तांबे यांनी धावत येऊन कुत्र्यांना हुसकावून लावले. मात्र, तोपर्यंत कुत्र्यांनी रुपाली यांना गंभीररीत्या जखमी केले होते.
शिरदाळे परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून गावातील लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील स्थानिक कुत्रे तसेच बाहेरून आलेल्या कुत्र्यांमध्ये वारंवार संघर्ष होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या घटनेची गंभीर दखल घेऊन भटक्या कुत्र्यांवर तातडीने योग्य ती कार्यवाही करून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिरदाळे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच ज्या नागरिकांकडे पाळीव कुत्रे आहेत, त्यांनी त्यांना जबाबदारीने बांधून ठेवावे आणि त्यांचा त्रास इतर ग्रामस्थांना होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट
भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करा
“भटक्या कुत्र्यांचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. आजच्या हल्ल्यात लहान बाळ थोडक्यात बचावले. मात्र, असे प्रकार वारंवार घडत राहिले तर भविष्यात एखाद्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने भटक्या कुत्र्यांचा योग्य बंदोबस्त करणे गरजेचे आहे. तसेच पाळीव कुत्रे असलेल्या नागरिकांनीही त्यांना बांधून ठेवून जबाबदारीने काळजी घ्यावी.”
— मयूर सरडे, माजी उपसरपंच, शिरदाळे ता. आंबेगाव जिल्हा पुणे





