मंचर प्रतिनिधी
ग्रामीण भागातील युवकांनी नोकरीच्या मागे न लागता आधुनिक शेतीपूरक व्यवसाय स्वीकारल्यास चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील युवक अविनाश बाळू लबडे यांनी घालून दिले आहे. त्यांनी अवघ्या दोन गुंठे जागेत रेशीम उद्योग सुरू करून अल्पावधीत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
अविनाश लबडे यांनी सांगितले की, रेशीम उद्योगातील एक बॅच तयार होण्यासाठी साधारण ४५ दिवसांचा कालावधी लागतो. प्रत्येक बॅचनंतर सर्व खर्च वजा जाता सुमारे ८० हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळते. कमी कालावधीत चांगला आर्थिक परतावा मिळत असल्याने येत्या काळात हा व्यवसाय आणखी वाढविण्याचा त्यांचा मानस आहे.
सध्या बाजारात रेशीम कोषाला प्रति किलो 700 ते 800 रुपये किलो दर मिळत असल्याने या व्यवसायाला चांगली मागणी आहे. कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय शेतकरी व ग्रामीण युवकांसाठी फायदेशीर ठरत आहे.
ग्रामीण भागातील युवकांनी केवळ नोकरीच्या शोधात न राहता स्वतःचा उद्योग-व्यवसाय उभारण्याचा विचार करावा. स्वावलंबी व्यवसायातून आर्थिक प्रगतीबरोबरच इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असा संदेश अविनाश लबडे यांनी दिला आहे.





