आळेफाटा प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे माळशेज घाटातील करंजाळे गावाच्या हद्दीत रस्ता खचल्याने अहिल्यानगर–कल्याण महामार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवाशांनी माळशेज घाटाऐवजी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन महामार्ग सुरक्षा पथक आळेफाटा येथील ए.पी.आय. शरद शिंपणे व पी.एस.आय. शिवाजी नऱ्हे यांनी केले आहे.
महामार्ग सुरक्षा पथकाच्या माहितीनुसार, करंजाळे गावाच्या हद्दीत मुसळधार पावसामुळे रस्त्याचा काही भाग खचला असून, पुढील दुर्घटना टाळण्यासाठी माळशेज घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. संबंधित यंत्रणेकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, दुरुस्तीचे काम सुरू झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
आळेफाट्यावरून कल्याण व मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी आळेफाटा–संगमनेर–नाशिक–कसारा घाट या मार्गाचा वापर करावा. तसेच आळेफाटा–मंचर–चाकण–लोणावळा–मुंबई–कल्याण या पर्यायी मार्गाचाही अवलंब करता येईल, असे पी.एस.आय. शिवाजी नऱ्हे यांनी सांगितले.
सर्व वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, बंद असलेल्या माळशेज घाटातून प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये आणि सुरक्षित पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन ए.पी.आय. शरद शिंपणे यांनी केले आहे.





