मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. मात्र या भागात अधिकृत पर्जन्यमान मापक (रेनगेज) नसल्याने नेमका किती मिलिमीटर पाऊस झाला, याची माहिती नागरिक व शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रशासनाने या परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी पर्जन्यमान मापक बसवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मेंगडेवाडी, जारकरवाडी, निरगुडसर, लाखणगाव, पोंदेवाडी, पारगाव, शिंगवे, लोणी, धामणी आदी गावांमध्ये सध्या जोरदार पाऊस होत आहे. मात्र या भागातील पावसाची अधिकृत नोंद उपलब्ध नसल्याने शेतकरी, नागरिक तसेच स्थानिक प्रशासनाला अचूक माहिती मिळत नाही. तसेच हवामान विभागाकडून मिळणारा पावसाचा अंदाज, वाऱ्याचा वेग, संभाव्य पर्जन्यमान याबाबतची स्थानिक पातळीवरील माहितीही नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नाही.
शेती नियोजन, पीक व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्तींचा अंदाज तसेच आपत्कालीन परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यासाठी पर्जन्यमानाची अचूक माहिती अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मध्यवर्ती ठिकाणी आधुनिक पर्जन्यमान मापक व हवामान निरीक्षण केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून जोर धरत आहे.
स्थानिकांच्या या मागणीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर पर्जन्यमान मापक बसविण्याबाबत कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





