spot_img
spot_img
spot_img

लोणी–वाफगाव घाटात अतिवृष्टीने दरड व झाडे कोसळली; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

 

मंचर प्रतिनिधी

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका विविध भागांना बसत असून, आंबेगाव तालुक्यातील लोणी–वाफगाव मार्गावरील शिकोजीबाबा घाटात शुक्रवारी सकाळी अतिवृष्टीमुळे दरडसदृश मातीचा मलबा रस्त्यावर कोसळला. तसेच अनेक झाडे उन्मळून पडल्याने काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आंबेगाव तालुक्याला खेड ( राजगुरुनगर ) तालुक्याला जोडणारा लोणी–वाफगाव हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या घटनेमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

शिरदाळे ( ता . आंबेगाव ) येथील विद्यार्थी आदिनाथ तांबे हे अभ्यासासाठी लोणीकडे जात असताना त्यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तातडीने शिरदाळेचे माजी उपसरपंच मयुर सरडे यांना याबाबत माहिती दिली.

मयुर सरडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. लोंढे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. घटनेची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ जेसीबी व आवश्यक यंत्रसामग्री घटनास्थळी पाठवून रस्त्यावर पडलेला मलबा आणि झाडे हटविण्याचे काम सुरू केले. अवघ्या एका तासात रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा सुरळीत करण्यात आला.

दरम्यान, परिसरात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्याने घाट परिसरात पुन्हा दरड कोसळण्याची किंवा झाडे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय अशा धोकादायक घाटरस्त्यांवरून प्रवास टाळावा आणि मोबाईलमध्ये प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. लोंढे यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या