मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील अवसरी फाटा ते जांबुत शिक्रापूर रस्त्यासाठी तीनशे कोटी रुपयेहुन अधिक खर्च करून सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, कामाच्या संथ गतीमुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत सध्या पावसाचे दिवस असल्याने या रस्त्यावर नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी सदर रस्त्याच्या कामाकडे लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे
सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी जुना डांबरी रस्ता उखडण्यात आला आहे. मात्र, खोदकाम झाल्यानंतर अनेक ठिकाणी रस्ता अपूर्ण अवस्थेत सोडण्यात आल्याने पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने लहान-मोठे अपघात घडत आहेत. “रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या मार्गावर शालेय विद्यार्थी, कामगार, शेतकरी तसेच अनेक प्रवासी या रस्त्यावरून प्रवास करत आहे तसेच आंबेगावच्या पूर्व भागातील अनेक गावांचा संपर्क मंचर गावाशी याच मार्गाने असल्याने या रस्त्यावर दिवसभर मोठी वाहतूक असते. अशा परिस्थितीत कामाच्या ठिकाणी आवश्यक इशारा फलक, सुरक्षिततेची उपाययोजना आणि वाहतूक नियोजनाचा अभाव असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
रस्त्याच्या कामावर संबंधित विभागाचे अधिकारी पुरेशी देखरेख करत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, अधिकारी व ठेकेदार यांच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तसेच रस्त्याच्या कामावर अल्पवयीन मुली व महिलांकडून काम करून घेतले जात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची संबंधित प्रशासनाने तातडीने चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
रस्त्याच्या दर्जाची नियमित तपासणी करून कामाला गती द्यावी आणि नागरिकांची गैरसोय तातडीने दूर करावी, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.





