spot_img
spot_img
spot_img

मांदळेवाडीत विजेच्या कडकडाटाने सोलर व इनव्हर्टरचे नुकसान; वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीटंचाईची समस्या

 

मंचर प्रतिनिधी 
 आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील जारकरवाडी, लोणी, धामणी, लाखणगाव, पोंदेवाडी परिसरात रविवारी मान्सून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना गती मिळणार असल्याने बळीराजा सुखावला आहे.

मात्र, या पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे आणि विजांच्या कडकडाटामुळे मांदळेवाडी परिसरात मोठे नुकसान झाले. मांदळेवाडी येथील ॲड. अशोक पालेकर पाटील यांच्या घरावरील सोलर यंत्रणेवर वीज कोसळल्याने स्फोटासारखा मोठा आवाज झाला आणि सोलर संचाचे मोठे नुकसान झाले.
तसेच गावातील विलास गोरडे, संभाजी आदक, दगडूभाऊ आदक यांच्या घरांतील इनव्हर्टर तसेच मारुती मंदिर आणि ग्रामपंचायत कार्यालयातील इनव्हर्टरही विजेच्या तीव्र धक्क्यामुळे निकामी झाले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

दरम्यान, जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटामुळे मांदळेवाडी गावाचा वीजपुरवठा रविवारी (दि. २१) सायंकाळी सुमारे चार वाजल्यापासून खंडित झाला. सोमवारी (दि. २२) दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा विस्कळीत होऊन जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ग्रामस्थांनी महावितरणने तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या