मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाखणगाव, पोंदेवाडी, लोणी, धामणी, जारकरवाडी परिसरात रविवारी मान्सून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जून महिन्याचा निम्म्याहून अधिक कालावधी उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होता. मात्र, आज झालेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक तसेच पशू-पक्षीही चिंतेत होते. वाढते तापमान आणि तीव्र उकाड्यामुळे जनजीवन त्रस्त झाले होते. अशा परिस्थितीत झालेल्या मान्सूनच्या आगमनामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
रविवारी दुपारपासूनच पूर्व आंबेगावात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास लोणी, धामणी, जारकरवाडी, पोंदेवाडी आणि लाखणगाव परिसरात ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे काही काळानंतर नागरिकांची तारांबळ उडाली.
गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या प्रचंड उकाड्यानंतर पावसामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. मात्र, पहिल्याच जोरदार पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान, पावसाअभावी रखडलेली पेरणीपूर्व मशागतीची कामे आता वेगाने मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आशेचे भाव उमटले असून खरीप हंगामाबाबत नव्याने आशावाद निर्माण झाला आहे.
चौकट : “गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती. आज झालेल्या दमदार पावसामुळे पेरणीपूर्व कामांना गती मिळणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.” संदीप पोखरकर पोंदेवाडी शेतकरी





