मंचर प्रतिनिधी
मंचर–शिरूर–राजगुरूनगर–लोणी या महत्त्वाच्या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सुरू करण्यासाठी आंबेगाव तालुका भाजप पूर्व मंडल अध्यक्ष किरण वाळुंज यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. या संदर्भात वाळुंज यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्रव्यवहार करून बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभाग, पुणे यांना सदर मार्गावरील बससेवा सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे समजते.
त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंचर, शिरूर, राजगुरूनगर आणि लोणी या परिसरातील शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच कामगार वर्गासाठी ही बससेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सध्या या मार्गावर सार्वजनिक वाहतुकीची पुरेशी सुविधा नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सदर बससेवा सुरू झाल्यानंतर नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न सुटणार असून दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. तसेच शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि शासकीय कामांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या बससेवेसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल परिसरातील नागरिकांनी किरण वाळुंज यांचे आभार मानले असून लवकरात लवकर बससेवा प्रत्यक्ष सुरू व्हावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.





