मंचर प्रतिनिधी
जारकरवाडी (ता. आंबेगाव) : सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत अनेक अडचणी आणि खडतर परिस्थितीवर मात करत जारकरवाडी येथील अनिल ज्ञानेश्वर भांड यांनी महाराष्ट्र पोलीस दलात निवड होण्याचे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे जारकरवाडी परिसराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
अनिल भांड यांचे शालेय व माध्यमिक शिक्षण जारकरवाडी गावात झाले. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणासोबतच त्यांनी पोलीस भरतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तयारी केली. विविध अडचणींचा सामना करत त्यांनी अखेर महाराष्ट्र पोलीस दलात निवड होण्याचे स्वप्न साकार केले.
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर मिळवलेले हे यश परिसरातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या निवडीची माहिती समजताच जारकरवाडी व परिसरातील ग्रामस्थ, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अनिल भांड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जिद्द, मेहनत आणि सातत्य असेल तर कोणतीही परिस्थिती यशाच्या आड येऊ शकत नाही, हे अनिल भांड यांच्या यशातून अधोरेखित झाले आहे.





