spot_img
spot_img
spot_img

पोंदेवाडीत कांदा चाळीत चोरट्यांचा डल्ला; २५ ते २६ पिशव्या लंपास कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने चोरीचे सत्र; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

 

मंचर प्रतिनिधी

पोंदेवाडी (ता. आंबेगाव) :  येथील शेतकरी मयूर आनंदराव रोडे यांच्या कांदा चाळीतून अंदाजे २५ ते २६ कांदा पिशव्यांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.
सध्या कांद्याला बाजार समितीत साधारणपणे ३० ते ५० रुपये प्रति किलो बाजारभाव मिळत असल्याने चोरट्यांनी कांद्यावरच डल्ला मारल्याचे दिसून येत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांनी कांद्याला भविष्यात चांगला बाजारभाव मिळेल, या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात कांदा चाळीत साठवून ठेवला आहे.

सध्या कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, कांद्याच्या वाढलेल्या दराचा फायदा घेत चोरट्यांनी आता कांदा चाळींना लक्ष्य केल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांच्या कांदा चाळी घरापासून दूर अंतरावर असून, रात्रीच्या वेळी या चाळींकडे फारसे लक्ष राहत नाही. त्यामुळे चोरट्यांना कांदा चोरी करणे सोपे जात असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.

कांदा चोरीच्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, कांदा चाळींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कांदा चाळीत साठवलेल्या शेतमालाच्या सुरक्षेसाठी संबंधित शेतकऱ्यांनीही सतर्क राहून कांदा चाळींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे

चौकट
माझ्या कांदाचाळीतुन साधारण पंचवीस ते सव्वीस कांदा पिशव्या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत यामध्ये माझे साधारण पंचावन्न ते साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे सदर चोरीबाबत कायदेशीर प्रक्रिया मी पार पाडली आहे
मयुर आनंदराव रोडे – शेतकरी पोंदेवाडी

चौकट

कांदा उत्पादन घेण्यास मोठे भांडवली खर्च आहे यामध्ये कधी निसर्गनिर्मित तर कधी मानव निर्मित संकट येत आहे यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कांदा चाळीत साठवणूक केलेल्या कांद्याला विमाकवच मिळावे यासाठी कृषी विभागाकडे प्रयत्न करणार आहे

अंकीता वाळुंज – पंचायत समिती सदस्या आंबेगाव

Related Articles

ताज्या बातम्या