मंचर प्रतिनिधी
नागापूर ( ता . आंबेगाव ) येथील मिंढेवस्ती परिसरातून चोरीस गेलेल्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी प्लेट चोरी प्रकरणाचा छडा लावत पारगाव (कारखाना) पोलिसांनी सराईत चोरट्यांना जेरबंद केले आहे. सदर कारवाईत चोरीस गेलेल्या सुमारे २२ हजार २०० रुपयांच्या ३७ लोखंडी प्लेट जप्त करण्यात आल्या आहेत.
पारगाव कारखाना पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते १७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत नागापूर मिंढेवस्ती (ता. आंबेगाव) येथील बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या ३७ लोखंडी प्लेट अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या होत्या.
याप्रकरणी पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर देवगाव येथील काठापूर बुद्रुक फाटा परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये चोरीस गेलेल्या लोखंडी प्लेट आढळून आल्या.
पोलिसांनी वाहन चालक अतिश दिलीप गव्हाणे (वय १९, रा. कवठे येमाई, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. कोहकडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने रतन मांगीलाल राठोड (रा. पारगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) याच्या साथीने चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी दोघांविरुद्ध कारवाई करून चोरीस गेलेल्या ३७ लोखंडी प्लेट जप्त केल्या आहेत.
सदर कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, खेड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलीस हवालदार अमोल वडेकर, अविनाश कालेकर, पोलीस अंमलदार संजय साळवे, मंगेश अभंग, चंद्रकांत गव्हाणे तसेच पोलीस मित्र रामदास वाळुंज यांनी पार पाडली.





