मंचर प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले असून, जारकरवाडी ( ता . आंबेगाव ) येथूनही भाविक मोठ्या उत्साहात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी रवाना झाले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व जारकरवाडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जारकरवाडी येथून दोन एसटी बस पंढरपूरकडे रवाना करण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नियमानुसार या बससेवेचे नियोजन करण्यात आले. या दोन बसमधून एकूण ८० भाविक पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी रवाना झाले. बस रवाना होताना भाविकांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल”च्या गजरात भाविकांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले.
या उपक्रमासाठी सरपंच प्रतीक्षा बढेकर, उपसरपंच सचिन टाव्हरे, माजी उपसरपंच कौसल्या भोजने, ग्रामपंचायत सदस्य सुरेश मंचरे सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच परिवहन विभागाचे श्रीरंग तांबडे यांचे विशेष सहकार्य केले.
ग्रामपंचायत कार्यालय जारकरवाडी व परिवहन विभागाच्या समन्वयामुळे भाविकांना सुरक्षित व नियोजनबद्ध प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.





