मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील लोणी गावाजवळील ओढ्यावर सुरू असलेल्या साकव पुलाच्या कामाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तब्बल वर्षभरापासून हे काम सुरू असतानाही संबंधित ठेकेदाराने कामाचा माहिती फलक लावलेला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
हा पूल कोणत्या निधीतून, कोणत्या योजनेअंतर्गत बांधला जात आहे, कामाची मुदत किती आहे आणि काम पूर्ण झाले आहे की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

याहून गंभीर बाब म्हणजे पुलावर अद्याप संरक्षक कठडे बसविण्यात आलेले नाहीत. हा रस्ता पुढे बेल्हा–जेजुरी महामार्गाला जोडला जात असल्याने रांजणगाव, कारेगाव, सणसवाडी औद्योगिक वसाहतींकडे जाणारी अवजड वाहने आणि इतर हजारो वाहने दररोज या मार्गावरून धावतात. पुलाची उंची लक्षात घेता, एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
लोणी गाव जारकरवाडी–पारगाव जिल्हा परिषद गटात येत असून या गटाचे नेतृत्व जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्याकडे आहे. उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी या कामाकडे लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे जारकरवाडी पारगाव जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामांबाबत ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू असून, संबंधित कामांचा दर्जा, कामाची गती आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांची तातडीने तपासणी करण्याची मागणी जोर धरत आहे.
सदर पुलाच्या कामावर माहिती फलक लावण्यात आलेला नाही त्यामुळे सार्वजनिक निधीतून सुरू असलेल्या कामांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित यंत्रणेने या पुलाची तातडीने पाहणी करून माहिती फलक उभारणे, संरक्षक कठडे बसविणे आणि कामाचा दर्जा तपासून आवश्यक ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.





