मंचर प्रतिनिधी
कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या हातात आलेला मोबाईल आता त्यांच्या अभ्यासावरच विपरीत परिणाम करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शाळा आणि महाविद्यालये नियमित सुरू झाल्यानंतरही अनेक शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना विविध व्हॉट्सॲप गटांवर गृहपाठ, नोट्स व अभ्यासक्रम पाठवला जात असल्याने विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईलचा वापर वाढला आहे.
अनेक विद्यार्थी “शिक्षकांनी अभ्यास पाठवला आहे” असे कारण सांगून तासन्तास मोबाईलमध्ये गुंतून राहत असल्याची तक्रार पालकांकडून केली जात आहे. अभ्यासाच्या नावाखाली सोशल मीडिया, ऑनलाइन गेम्स, व्हिडिओ आणि इतर मनोरंजनात्मक ॲप्सचा वापर वाढत असल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे.
शिक्षणतज्ज्ञांच्या मते, लहान वयातच मोबाईलचे व्यसन लागल्यास विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो. एकाग्रता कमी होणे, डोळ्यांचे विकार, झोपेच्या समस्या तसेच सामाजिक संवादात घट होणे यासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
यामुळे शिक्षकांनी अत्यावश्यक असल्याशिवाय मोबाईलद्वारे गृहपाठ पाठविणे टाळावे, तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांना केवळ आवश्यक कामापुरताच मोबाईल उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी शिक्षक, पालक आणि समाजाने एकत्रितपणे मोबाईलच्या अतिवापरावर नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे





