spot_img
spot_img
spot_img

वडगावपीर येथे विज पडून सहाशे वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाला आग; भीमाशंकर कारखान्याच्या टँकरमुळे आग आटोक्यात

 

मंचर प्रतिनिधी 

वडगावपीर, ता. आंबेगाव : वडगावपीर येथील श्री पिरसाहेब देवाच्या पाठीमागे असलेल्या सुमारे सहाशे वर्षे जुन्या ऐतिहासिक चिंचेच्या झाडावर रविवारी (दि. २१) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वीज पडल्याने झाडाला आग लागल्याची घटना घडली. सोमवारी (दि. २२) पहाटे झाडाला आग लागल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.

ही बाब लक्षात येताच फकीरा मुजावर यांनी माजी सरपंच संजय पोखरकर व जायदाबी मुजावर यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना प्रशासनाशी  संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून  कारखाना प्रशासनाने ़कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व उपाध्यक्ष ॲड. प्रदीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पाण्याचा टँकर घटनास्थळी रवाना केला. कारखान्याच्या पाण्याच्या टँकरने दोन फेऱ्या मारून चिंचेच्या झाडावरील आग आटोक्यात आणली. मात्र, आग लक्षात येईपर्यंत झाडाच्या दोन मोठ्या फांद्या जळून खाली पडल्या होत्या.

चिंचेच्या झाडाला आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी श्री पिराच्या दर्गा परिसरात मोठी गर्दी करून घटनास्थळी धाव घेतली व झाडाची पाहणी केली. आग आटोक्यात आल्याने संभाव्य मोठी हानी टळली.

यावेळी नंदूभाई मुजावर, हनीफ मुजावर, फकीरा मुजावर तसेच ग्रामस्थांनी तातडीने मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष ॲड. प्रदीप वळसे पाटील,  कारखाना प्रशासनाचे आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या