वळती प्रतिनिधी ( विलास भोर )
आंबेगाव तालुक्यातील नागापूर येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे नदीवरील शेतीपंप चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. अशोक विश्वनाथ निकम (वय ४४) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक निकम हे आपल्या शेतासाठी नदीकाठावरील शेती पंप सुरू करण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक विजेचा जोरदार धक्का लागल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक संदीप घुले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेतील निकम यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे दाखल केले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच नागापूर परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य करत जखमी शेतकऱ्याला रुग्णालयात हलविण्यास मदत केली
विशेष म्हणजे, शेजारी थोरांदळे गावातही काल ( दि. १४ ) रोजी विजेचा धक्का लागून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नागापूर येथेही अशीच घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आंबेगाव तालुक्यात महिन्याभरात विजेचा धक्का लागून मृत्यू होण्याची ही तिसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे वीज सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या घटनेमुळे नागापूर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून निकम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, घटनेचा पुढील तपास पारगाव कारखाना पोलीस स्टेशन करत आहे.





