मंचर प्रतिनिधी
पारगाव कारखाना (ता. आंबेगाव) पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी आपल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत पहाडदरा येथील ठाकरवाडीमध्ये जाऊन सर्वसामान्य कुटुंबांना दिवाळीनिमित्त फराळाचे वाटप केले. तसेच ग्रामस्थांसमवेत दिवाळी सण साजरा करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
दिवाळी हा आनंदाचा आणि आपुलकीचा सण सर्वांनाच आनंदाने साजरा करता यावा, या उद्देशाने स.पो.नि.सचिन कांडगे यांनी ठाकरवाडीतील वंचित व सर्वसामान्य कुटुंबांपर्यंत पोहोचून फराळाचे वाटप केले. पोलिसांना केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित न ठेवता समाजातील प्रत्येक घटकाशी आपुलकीचे नाते निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
सचिन कांडगे यांनी पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यापासून पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विविध गावांमध्ये अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. गरजू व वंचित घटकांना मदतीचा हात देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो.
या उपक्रमावेळी पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, पहाडदरा व ठाकरवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. पोलिसांच्या या आपुलकीच्या उपक्रमाचे पूर्व आंबेगाव परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.





