मंचर प्रतिनिधी
परमपूज्य संत आसाराम बापूजी यांच्या सत्प्रेरणेने आणि साधक बंधू-भगिनींच्या योगदानातून गुरुवार (दि. ५ नोव्हेंबर) रोजी खेते पठार या अतिदुर्गम आदिवासी भागात दीपावली भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून आदिवासी कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा साहित्य, साड्या तसेच दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंचे वाटप करून त्यांची दिवाळी आनंदात साजरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
खेते पठार हा परिसर आंबेगाव तालुक्याच्या सर हद्दीवर आहे परिसर अतिशय दुर्गम असून येथे मूलभूत सोयी-सुविधांचाही अभाव आहे. अशा परिस्थितीत साधक बंधू-भगिनींनी तब्बल दीड तास पायी प्रवास करून या भागात पोहोचत सामाजिक बांधिलकी जपली. आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी स्थानिक ग्रामस्थ, महिला आणि तरुणांनी मोलाचे सहकार्य केले.
या उपक्रमात जरे गुरुजी, निलेश मिडगे सर, मनकर सर, सोनवणे सर, शिवाजी टाव्हरे, हारकू लबडे, काळुराम टाव्हरे, विकास केदारी, कृष्णा सोनवणे यांच्यासह साधक बंधू उपस्थित होते.
दुर्गम भागातील गरजू आदिवासी बांधवांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचविण्याच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.





