मंचर प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री तथा आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. अनिलभाऊ वाळुंज युवा प्रतिष्ठान, पोंदेवाडी आणि आंबेगाव पंचायत समितीच्या सदस्या कु. अंकिताताई अनिलभाऊ वाळुंज यांच्या प्रयत्नातून जारकरवाडी पंचायत समिती गणातील गरीब व गरजू महिलांना ६५ पीठ गिरण्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
मंगळवार (दि. १० नोव्हेंबर) रोजी सकाळी १० वाजता पोंदेवाडी गावठाण (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जारकरवाडी पंचायत समिती गणांतर्गत येणाऱ्या तेरा गावांमधील आर्थिकदृष्ट्या गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. महिलांना घरगुती व्यवसायासाठी तसेच दैनंदिन कामकाजात मदत व्हावी, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सामाजिक बांधिलकी जपत महिलांच्या हाताला रोजगार मिळावा आणि ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना आधार मिळावा, या उद्देशाने अनिलभाऊ वाळुंज युवा प्रतिष्ठान व कु. अंकिताताई वाळुंज यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जारकरवाडी पंचायत समिती गणात करण्यात आले असून, परिसरातील नागरिकांनी व लाभार्थी महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





