मंचर प्रतिनिधी
कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे कांद्याचे दर पडत असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात प्रचंड रोष आहे. त्याविरोधात मंगळवार २ जून २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता मंचर जवळील भोरवाडी, अवसरी खुर्द येथील नंदीचौकात आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली.
शेतकऱ्यांना बरोबर घेऊन निकम यांनी यापूर्वी मंचर, आळेफाटा आणि चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंदोलन करत कांद्याचे लिलाव बंद पाडले होते.
कांद्याला भाव मिळत नसल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रोश करत आहे. कांदा विकून मिळणाऱ्या पैशातून खर्चही भागत नाही; याउलट शेतकऱ्यालाच खिशातून वाहतूक भाडे देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशा संकटाच्या परिस्थितीत कांद्याला 25 रुपये प्रतिकिलो हमीभाव द्यावा, जानेवारी ते मे दरम्यान विकल्या गेलेल्या कांद्याला अनुदान द्यावे.
कांद्याची निर्यात तत्काळ सुरू करावी आणि शिरूरच्या भागात महावितरण कडून सुरू असलेले भारनियमन तत्काळ थांबवावे, या आंदोलकांच्या मागण्या आहेत.
या आंदोलनाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार निलेश लंके, खासदार अमोल कोल्हे, आमदार सचिनभाऊ अहिर, आमदार शरद सोनवणे, आमदार बाबाजी काळे आणि सर्वपक्षीय नेते मंडळी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन देवदत्त निकम यांनी शेतकऱ्यांना केले आहे.





