मंचर
पूर्व आंबेगावात वन्यजीव अन्न पाण्याचा शोधात मानव वस्तीकडे फिरकताना दिसत आहे साधारण तीन दिवसापूर्वी पोंदेवाडी ( ता. आंबेगाव ) येथील एका वस्तीत बिबट्याचा दिवसाढवळ्या दिसणारा व्हिडिओ समाज माध्यमावर फिरताना दिसत आहे पूर्व आंबेगावातील मेंगडेवाडी, जारकरवाडी, ज्ञानेश्वरवस्ती, पोंदेवाडी, खडकवाडीसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्या मोरासह अन्य वन्यजीव प्राण्यांच वास्तव्य आहे
वाढते वणवे, वाढते तापमान, चारा-पाणी टंचाईमुळे निसर्गातील वन्य जीव प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे वाढला आहे. निसर्गातील वन्य प्राण्यांच्या पानावठ्यांच्या संख्येत वाढ करणे गरजेचे आहे
वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण झाले असताना वन्य प्राण्यांच्या मानवी वस्तीतील वावराने नागरिक भयभीत झाले आहेत. उन्हाळ्याच्या कालावधीत जंगल क्षेत्रात ओस पडणारे पाण्याचे साठे आणि ओल्या चाऱ्याची टंचाईमुळे जंगली प्राणी नागरी वस्तीत शिरकाव करण्याच्या प्रकारात वाढ होते.
जंगलांना आगी लावण्याच्या प्रकारामुळे प्राण्यांचे अधिवास संपुष्टात येत आहेत. ही मनुष्य आणि वन्य प्राण्यांतील संघर्षामागील प्रमुख कारण असल्याचे वन्य अभ्यासकांचे म्हणणे आहे.
तालुक्यात असलेल्या जंगल, वनसंपदेमुळे परिसरात वन्यजीवांचा सतत वावर असतो. मागील काही दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे तालुक्याच्या डोंगरदऱ्यातील पाण्याचे स्त्रोत कमी झाले आहेत. जंगलांना लागलेल्या वनव्यामुळे चारा संपुष्टात आला आहे. चाऱ्याची कमतरता, अन्न व पाण्याच्या शोधार्थ वन्यजीव मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत.
वन हद्दीतील व खासगी क्षेत्रातील डोंगर रांगांना वणवे लावण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी वनसंपदा नष्ट होत असून वन्यप्राण्यांच्या पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. जंगलातील झरे, वनतळे आटले आहे. परिणामी पाणी व चाऱ्याच्या शोधात वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीत वळवला आहे.





