मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यात विविध ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा तडाखा बसला. तालुक्याच्या पूर्व भागातील मेंगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, काठापूर, लाखणगाव, लोणी धामणी शिंगवे, पारगाव परिसरात दुपारी चार नंतर झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळीने शेतकऱ्यांची धांदल उडाली होती. काढून ठेवलेला उन्हाळी कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची सायंकाळी धावपळ सुरू होती प्लास्टिक कागदांचे दर वाढल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला याबाबत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली
तर उन्हामुळे त्रस्त नागरिकांना हलक्या पावसाने काही प्रमाणात गारव्याने दिलासा मिळाला. दुपार नंतर वातावरणात बदल झाला होता. दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने पुर्व भागात तुरळक हजेरी लावली.
दुपारी चार वाजेपर्यंत विजांच्या कडकडाटात पावसाने जोर धरला होता परंतु तुरळक पाऊस पडला सोसाट्याचा वारा विजेंचा कडकडाट मात्र चांगला सुरू होता कांद्याच्या गडगडलेल्या बाजारभावाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांची कांदा झाकण्यासाठी मोठी धांदल उडाली होती.
पावसाच्या हलक्या सरी बरसल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून पावसाच्या आगमनामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे परंतु अवकाळी पावसाने कांदा उत्पादकांची चांगली तारांबळ उडाली आहे





