spot_img
spot_img
spot_img

पावसाअभावी पूर्व आंबेगावातील शेतकरी संकटात; चाराटंचाई व पिकांचे मोठे नुकसान

 

मंचर प्रतिनिधी 
पूर्व आंबेगाव तालुक्यात यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. जून महिना अर्ध्यावर येऊनही समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळी भागातील शिरदाळे पहाडदरा लोणी वडगावपीर मांदळेवाडी आदी गावांमध्ये चाराटंचाई आणि पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत आहे. जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध नसल्याने पशुपालकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
दुसरीकडे, बागायती पट्ट्यातील अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, जारकरवाडी, निरगुडसर, पोंदेवाडी, लाखणगाव, देवगाव, पारगाव शिंगवे, काठापूर बुद्रुक गावातील शेतकऱ्यांनी एप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या आशेने भाजीपाला व तरकारी पिकांची लागवड केली होती. मात्र, अपेक्षित पाऊस न झाल्याने आणि वाढत्या उष्णतेमुळे ही पिके करपण्याच्या मार्गावर आहेत.

अनेक ठिकाणी पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून शेतकऱ्यांनी केलेला खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पाण्याअभावी विहिरी, बोअरवेल आणि जलस्रोतांची पातळी झपाट्याने खालावत असल्याने सिंचनासाठीही अडचणी निर्माण झाल्या आहेत.

परिणामी, शेतकऱ्यांना पिके वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पाऊस लवकर न झाल्यास खरीप हंगामावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“यंदाचा हंगाम वाया जातो की काय” अशी चिंता शेतकऱ्यांच्या मनात घर करू लागली आहे. शेतकरी आता आकाशाकडे डोळे लावून बसला असून लवकरात लवकर दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनानेही परिस्थितीची दखल घेऊन संभाव्य चाराटंचाई व पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या