मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून त्याचा फटका आता पोल्ट्री व्यवसायालाही बसू लागला आहे. लाखनगाव ( ता. आंबेगाव ) येथील पोल्ट्री व्यवसायिक ज्ञानेश्वर पोंदे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये अचानक तब्बल ३७०० कोंबड्या मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, तीव्र उष्णता व उष्माघातामुळे कोंबड्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच आंबेगाव तालुका पंचायत समितीचे पशुसंवर्धन अधिकारी पांडे तसेच महसूल विभागाचे कोतवाल विकास दाभाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पंचायत समिती सदस्या अंकिता वाळूंज, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यावेळी उपस्थित होते
नुकसानग्रस्त पोल्ट्री व्यवसायिक ज्ञानेश्वर पोंदे यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे अंकिता वाळूंज यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरातील पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, जून महिना संपत आला तरीही पावसाने हजेरी न लावल्याने शेतकरी आणि विविध व्यवसायांवर मोठे संकट ओढवले आहे. चारा, पाणी आणि वाढत्या तापमानामुळे पशुपालक, पोल्ट्री व्यावसायिक तसेच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसह ग्रामीण भागातील व्यावसायिक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत.





