मंचर
दि. ३० एप्रिल २०२६ रोजी गायत्री अवधानी (राजगुरव) यांची महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागामार्फत पुणे जिल्ह्याच्या “मानद वन्यजीव रक्षक” या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ही नियुक्ती वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत करण्यात आली आहे.
अवधानी या सन २००५-०६ पासून वन्यजीव संरक्षण, सर्पमित्र आणि निसर्ग अभ्यासक म्हणून कार्यरत आहेत. शालेय जीवनापासूनच त्यांनी सापांविषयी जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे. विविध शाळा, महाविद्यालये तसेच ग्रामीण भागात त्यांनी व्याख्याने, प्रदर्शने आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित केले आहेत.
सापांच्या फ्लेक्स फोटोच्या माध्यमातून सापांची ओळख, विषारी व बिनविषारी साप, सापांचे विषप्रकार, सर्पदंश टाळण्याचे उपाय आणि सर्पदंशानंतर घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी समाजात व्यापक जनजागृती केली आहे. तसेच वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्याचे कार्य त्या सातत्याने करत आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेत “वाइल्डलाइफ प्रोटेक्शन अॅण्ड रिसर्च सोसायटी इंडिया”, सातारा यांनी त्यांना २०१७ मध्ये राज्यस्तरीय सर्पमित्र पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच “अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट”, शारदानगर (बारामती) यांनी २०१८ मध्ये “शारदा सन्मान पुरस्कार” देऊन गौरव केला आहे.
सध्या त्या “एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन, दौंड” या संस्थेच्या उपाध्यक्षा म्हणून कार्यरत असून, या संस्थेमार्फत निसर्ग जनजागृती, वृक्षारोपण, वन्यजीव बचाव, व्याख्याने आणि छायाचित्र प्रदर्शनाचे काम करत आहेत.
महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेत ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली असून, निसर्ग संरक्षण व व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी पुढील काळात अधिक जोमाने काम करणार असल्याचे गायत्री अवधानी (राजगुरव) यांनी सांगितले आहे.





