spot_img
spot_img
spot_img

कलगीतुरा शाहिरीचा पहाडी आवाज काळाच्या पडद्याआड

 

मंचर  प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल लोककला ‘कलगीतुरा’ घराघरांत पोहोचवणारे ज्येष्ठ शाहीर रामदास नाथाजी गुंड यांचे शनिवारी (दि. १८) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कलगीतुरा शाहिरी परंपरेतील अभ्यासू, पहाडी आवाजाचा एक दिग्गज लोककलावंत काळाच्या पडद्याआड गेला असून कला क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

रामदास नाथाजी गुंड यांचे मूळ गाव अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील काटाळवेढे हे होते. तसेच वळती, रांजणी, थोरांदळे, शिगवे या परिसरात त्यांचे मोठे चाहतेवर्ग निर्माण झाला होता. या भागातील अनेक कार्यक्रमांतून त्यांनी आपल्या शाहिरी कलेची छाप उमटवली होती.

राज्यभर विविध ठिकाणी कार्यक्रम सादर करत त्यांनी कलगीतुरा लोककलेचा झेंडा उंचावला. केवळ मनोरंजनापुरती मर्यादा न ठेवता, त्यांनी आपल्या शाहिरीतून सामाजिक व धार्मिक प्रबोधन, अनिष्ट प्रथांवर प्रहार, तसेच संत-महापुरुषांच्या विचारांचा प्रसार केला. ग्रामीण भागात शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठीही त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले.

रामदास नाथाजी गुंड यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी काटाळवेढे (ता. पारनेर) येथे रविवारी (दि. १९) अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व कला क्षेत्रातील मान्यवरांसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या