spot_img
spot_img
spot_img

धामणी येथे अ‍ॅड. कल्पेश कड पाटील यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न 

मंचर प्रतिनिधी 

धामणी (ता. आंबेगाव) येथे खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील सुपुत्र आणि धामणी गावचे भाचे अ‍ॅड. कल्पेश सुभाष कड पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग (JMFC & CJJD) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत न्यायाधीश पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ग्रामीण भागातून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेल्या या यशामागे त्यांच्या वडिलांचे अ‍ॅड. सुभाष कड पाटील यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्यांनी आपल्या अनुभवाचा योग्य उपयोग करून मुलाला घडवले.

या उल्लेखनीय यशाबद्दल नुकताच धामणी (ता. आंबेगाव) येथे करंडे, तांबे, करंजखेले, जाधव या नातेवाईक परिवाराच्या वतीने अ‍ॅड. कल्पेश कड पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अ‍ॅड. सुभाष करंडे यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड भूषण तांबे,माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, प्रतीक जाधव, गोपाळ रोडे, संदीप तांबे, सोमा जाधव, यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या.

सत्काराला उत्तर देताना अ‍ॅड. कल्पेश कड पाटील यांनी आपला खडतर प्रवास उलगडून सांगितला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर तेही मोठी यशे मिळवू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पालकांनी आपल्या मुलांना योग्य दिशा दिल्यास भविष्यात अधिकाधिक अधिकारी घडतील, असेही त्यांनी नमूद केले.

भाऊसाहेब करंडे यांनी आभार प्रदर्शन केले, तर मयूर सरडे यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

ताज्या बातम्या