spot_img
spot_img
spot_img

लोणी येथे लुपिन फाउंडेशनतर्फे ७० शेतकऱ्यांना तुषार सिंचन संचांचे वाटप जलसंधारणाच्या विविध कामांमुळे भूजल पातळी वाढण्यास मदत

 

मंचर प्रतिनिधी

लोणी (ता. आंबेगाव) येथे लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाउंडेशन, पुणे व इलिका पी. बी. व्हर्लपूल किचन अप्लायन्सेस प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘उपजीविका विकासासाठी जलसंसाधन प्रकल्पा’अंतर्गत ७० शेतकऱ्यांना तुषार सिंचन संचांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक शेतकऱ्याला एक एकर क्षेत्रासाठी संच देण्यात आल्याने कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यास मदत होणार आहे.

सध्या परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पाण्याचे योग्य नियोजन करणे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत तुषार सिंचन संचांचा वापर केल्यामुळे पाण्याची बचत होऊन भाजीपाला व इतर पिकांना कमी पाण्यात प्रभावी सिंचन करणे शक्य होणार आहे.

लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षात लोणी गावात आठ सिमेंट बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. तसेच गावातील तीन पाझर तलावांमधील गाळ काढण्यात आला असून जिल्हा परिषद शाळा, लोणी आणि उपबाजार समिती मंचर बाजार आवार, लोणी येथे रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे करण्यात आली आहेत. या जलसंधारणाच्या कामांमुळे पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविण्यास तसेच भूजल पातळी वाढण्यास मदत झाली आहे.

तुषार सिंचन संच वितरण कार्यक्रमास लोणी गावचे सरपंच सावळाराम नाईक, शरद बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, माजी सरपंच उद्धव लंके, जारकरवाडी पंचायत समितीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बाळशिराम वाळुंज, उपसरपंच राजेंद्र वाळुंज, पोलीस पाटील संदीप आढाव, भैरवनाथ विद्याधाम लोणीचे शिक्षण समिती सदस्य संतोष पडवळ, रमेश खोमणे आदी उपस्थित होते.

यावेळी लुपिन फाउंडेशनचे तालुका व्यवस्थापक प्रताप मोटे यांनी तुषार सिंचन संचांच्या माध्यमातून भाजीपाला पिकांना पाणी देऊन कमी पाण्यात अधिक उत्पादन कसे घेता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. फिनोलेक्सचे रोहित कदम यांनी तुषार सिंचन संचांची जोडणी, नियोजन व वापर याविषयी माहिती दिली. लुपिन फाउंडेशनचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी बाळासाहेब बोऱ्हाडे व मच्छिंद्र खरात उपस्थित होते.

कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या वतीने उपस्थित अधिकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. बाळशिराम वाळुंज यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या