Home गावागावातुन दुष्काळी शेतीचे तातडीने पंचनामे करा; उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश जुन्नर–आंबेगाव विभागातील महसूल, कृषी व पंचायत समिती प्रशासनाला संयुक्त पाहणीच्या सूचना

दुष्काळी शेतीचे तातडीने पंचनामे करा; उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश जुन्नर–आंबेगाव विभागातील महसूल, कृषी व पंचायत समिती प्रशासनाला संयुक्त पाहणीच्या सूचना

0
दुष्काळी शेतीचे तातडीने पंचनामे करा; उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश   जुन्नर–आंबेगाव विभागातील महसूल, कृषी व पंचायत समिती प्रशासनाला संयुक्त पाहणीच्या सूचना
मंचर प्रतिनिधी 
जुन्नर–आंबेगाव विभागातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने प्राथमिक पंचनामे करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी अर्चना तांबे यांनी दिले आहेत. यासाठी महसूल विभाग, पंचायत समिती आणि तालुका कृषी कार्यालयाने संयुक्तपणे क्षेत्रीय पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. 
जुन्नर व आंबेगाव तालुक्याच्या विविध भागांत जुलै महिन्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाने सलग दीर्घ उघडीप दिल्याने खरीप पिके संकटात आली आहेत. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. रोपांची वाढ थांबल्याने शेतकऱ्यांच्या प्रमुख पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत असल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी अर्चना तांबे यांनी दि. ३ ऑक्टोबर रोजी संबंधित विभागांना पत्र पाठवून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. महसूल विभाग, पंचायत समिती आणि तालुका कृषी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रात प्रत्यक्ष भेट देऊन शेतीपिकांची प्राथमिक पाहणी व पंचनामे करावेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सध्या सुरू असलेल्या ई-पीक पाहणीच्या कामकाजाअंतर्गत संबंधित कार्यालयांनी प्राथमिक पंचनाम्यांची प्रक्रिया तातडीने सुरू करावी. शेतकरी व नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या निवेदनांची दखल घेऊन कोणत्याही गावातील पाहणीचे काम प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच निर्धारित नमुन्यात नुकसानीचे अचूक पंचनामे करून त्याचा अहवाल तातडीने उपविभागीय कार्यालयात सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
या आदेशामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आता प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी किती वेगाने होते आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून कोणत्या सवलती व मदत मिळते, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here