spot_img
spot_img
spot_img

जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी द्या – विशाल वाबळे

 

 

मंचर प्रतिनिधी

राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल जालिंदर वाबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष धोंडीभाऊ भोर यांनी आंबेगावचे तहसीलदार यांना निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधले आहे. सदर निवेदन नायब तहसीलदार बांगर मॅडम यांना देण्यात आले आहे

निवेदनात म्हटले आहे की, शासनाने 2019 ते 2026 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीककर्जासाठी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली असली तरी त्यातील अटींमुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. विशेषतः 2019 च्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50 हजार रुपयांपर्यंतच कर्जमाफी देण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना एकवेळ समझोता (OTS) योजनेअंतर्गत उर्वरित रक्कम भरल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ देण्याची अटही शेतकरीविरोधी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधी मोठी रक्कम भरणे शक्य नसल्याने ही अट तत्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रोत्साहनपर अनुदानासाठी सलग चार वर्षे नियमित कर्जफेड करण्याची अटही अव्यवहार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, नापिकी, अवकाळी पाऊस आणि शेतमालाच्या घसरलेल्या दरांमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला असून अशा परिस्थितीत जाचक अटींची पूर्तता करणे शक्य नसल्याचे वाबळे यांनी स्पष्ट केले आहे.

याशिवाय 2017 च्या कर्जमाफी योजनेत पात्र असूनही कागदपत्रांच्या त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या सुमारे 6.56 लाख शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पीकविमा योजनेतील शेतकरीविरोधी अटी रद्द करून 1 रुपयांत पीकविमा योजना पुन्हा सुरू करावी, तसेच पेरणीपूर्वी कर्ज खात्यांचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांच्या खात्यात आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

“शेतकरी सध्या अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करीत असून त्याला दिलासा देण्यासाठी कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी हाच एकमेव पर्याय आहे,” असे मत श्री. विशाल जालिंदर वाबळे यांनी व्यक्त केले आहे. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

ताज्या बातम्या