मंचर प्रतिनिधी
खरीप हंगामाला सुरुवात झाल्यानंतर आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर युरियाची गरज असताना अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खतासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या कृषी सेवा केंद्रांकडे युरियाचा साठा उपलब्ध आहे, तेथेही सर्व शेतकऱ्यांना समान पद्धतीने खत वितरित केले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी ठरावीक शेतकऱ्यांनाच युरिया दिला जात असल्याचे सांगितले जात आहे. तर काही कृषी सेवा केंद्रांकडून कृषी औषधे अथवा इतर साहित्य खरेदी केल्याशिवाय युरिया दिला जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, आंबेगावच्या पूर्व भागातील काही कृषी सेवा केंद्र चालकांनी युरियाचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण केल्याची चर्चा शेतकरी वर्तुळात सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
युरिया खताचा पुरवठा सुरळीत राहावा तसेच कोणत्याही प्रकारची साठेबाजी, काळाबाजार किंवा शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्यास त्यावर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.
जिल्हास्तरीय कृषी अधिकाऱ्यांनी आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील कृषी सेवा केंद्रांची विशेष तपासणी मोहीम राबवून दोषी आढळणाऱ्या कृषी केंद्रांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.





