मंचर प्रतिनिधी
पशुपालन व दुग्ध व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गोपालकांचा गौरव सह्याद्री ॲग्रोव्हेटकडुन टाव्हरेवाडी (अवसरी बु )येथे मोठ्या उत्साहात पार पडला. आंबेगाव तालुक्यासह परिसरातील शेकडो शेतकरी व दुग्ध उत्पादकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान, पशुखाद्य व्यवस्थापन, जनावरांचे आरोग्य आणि दूध उत्पादन वाढीच्या विविध बाबींवर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. वैभव दिवेकर, श्री. भागाजी भांड (एरिया सेल्स मॅनेजर), सुरज जगदाळे, विशाल साबळे, श्री गणेश टाव्हरे, श्री संदिप थोरात, नवनाथ मंचरे (सचिव सोसायटी जारकरवाडी ), नवनाथ वाळुंज,यांनी पशुपालन व्यवसायातील आधुनिक संधी आणि वैज्ञानिक व्यवस्थापनाचे महत्त्व विशद केले.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे एकूण 25 उत्कृष्ट गोपालक जोडप्यांचा सन्मान होय. दुग्ध व्यवसाय, गोठा व्यवस्थापन आणि पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या या गोपालकांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सन्मानित करण्यात आलेल्या प्रत्येक गोपालक जोडप्याला गाय-वासराची आकर्षक मूर्ती, सन्मानपत्र तसेच गृहिणींना पैठणी साडी देऊन गौरविण्यात आले. पशुपालन व्यवसायातील महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या अनोख्या सन्मानामुळे उपस्थित शेतकरी बांधवांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमात सन्मानित गोपालकांनी आपले अनुभव मांडत यशस्वी दुग्ध व्यवसायासाठी शिस्तबद्ध व्यवस्थापन, संतुलित पशुखाद्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
त्यांच्या प्रेरणादायी अनुभवांमुळे अनेक शेतकरी बांधवांना नवीन दिशा मिळाली. यावेळी आंबेगाव शिरूर तालुक्यातील गोपालक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते





