मंचर प्रतिनिधी
आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. घोड कालव्यात तातडीने पाणी सोडावे, या मागणीसाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे उपाध्यक्ष केतन वाघ यांनी शेतकऱ्यांसमवेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेऊन निवेदन सादर केले.
या निवेदनात डिंभे धरणातून घोड कालव्यास तात्काळ पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली. मंत्री विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्याशी संपर्क साधला. तसेच संबंधित यंत्रणेला आवश्यक ती कार्यवाही करून घोड शाखा कालव्यात लवकरात लवकर पाणी सोडण्याचे निर्देश दिल्याची माहिती मिळाली आहे.
यावेळी थोरांदळे तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष शंकर टेमगिरे, डॉ. दत्तात्रय विश्वासराव, तसेच अनिल पोखरकर उपस्थित होते.
दरम्यान, या परिसरातील पाण्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. विहिरी व बोअरवेल्स कोरड्या पडल्या असून शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याचा तीव्र तुटवडा भासत आहे.
परिणामी पाण्याअभावी शेतमाल करपण्याच्या अवस्थेत आला असून अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेषतः भाजीपाला, ऊस तसेच फळबागांवर याचा मोठा परिणाम दिसून येत आहे.
पाण्याअभावी केवळ शेतीच नव्हे, तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना दैनंदिन वापरासाठीही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
अनेक शेतकरी चिंतेत असून शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.





