spot_img
spot_img
spot_img

जुन्नर तालुक्यातील तळेरान येथे हृदयद्रावक घटना; जुळ्या भावंडांचा पाझर तलावात बुडून मृत्यू

 

जुन्नर प्रतिनिधी 

जुन्नर तालुक्यातील वसईवाडी (ता. जुन्नर) येथील तळेरान गावात अत्यंत दुर्दैवी व मन हेलावून टाकणारी घटना घडली असून साबळे कुटुंबातील जुळी भावंडे कु. श्रावणी रामदास साबळे व कु. गणेश रामदास साबळे यांचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, साबळे कुटुंबीय दैनंदिन कामासाठी कपडे धुण्यासाठी गावाजवळील पाझर तलावावर गेले होते. यावेळी कुटुंबीय आपल्या कामात व्यस्त असताना ही दोन्ही लहान मुले तलावाच्या काठावर खेळत होती. खेळता खेळता ती पाण्यात उतरली असता अचानक खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाल्याची घटना घडली. काही वेळाने मुले दिसेनाशी झाल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली असता ही बाब लक्षात आली. तत्काळ ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले; मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले आहे. या घटनेने संपूर्ण तळेरान गाव शोकमग्न झाले आहे.

मृत श्रावणी व गणेश ही दोन्ही जुळी भावंडे इयत्ता चौथीत शिक्षण घेत होती. ते न्यू इंग्लिश स्कूल, घोडेगाव येथील विद्यार्थी असून अभ्यासात हुशार, नम्र व सर्वांशी मिळून मिसळून राहणारी अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या अकाली निधनामुळे शाळेतही शोककळा पसरली असून शिक्षक व विद्यार्थ्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

दरम्यान, अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी जलस्रोतांच्या ठिकाणी योग्य सुरक्षेची उपाययोजना करणे, तसेच लहान मुलांवर सतत लक्ष ठेवणे गरजेचे असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासनानेही या घटनेची दखल घेऊन आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे साबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावातून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या