मंचर प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. वाळुंजनगर, रानमळा, लाखणगाव, देवगाव, पोंदेवाडी, खडकवाडी आदी गावांना या नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसला आहे.

या पार्श्वभूमीवर जि.प. उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, जि.प. सदस्य विष्णू हिंगे तसेच आंबेगाव पंचायत समिती सदस्य अंकिता वाळुंज यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

विवेक वळसे पाटील यांनी माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी नुकसानीबाबत चर्चा केली. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
या वेळी महसूल व कृषी विभागाचे अधिकारी तसेच विविध गावांतील पदाधिकारी उपस्थित होते. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांदा, मका, फळबाग तसेच निवासी पत्र्यांच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आंबेगाव तालुक्यातील वाळुंजनगर, खडकवाडी, लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी, पोंदेवाडी, लाखणगाव आदी गावांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला आहे. महसूल व कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी तानाजी वाळुंज (रा. वाळुंजनगर, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांनी केली आहे.





