मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी प्रतिष्ठानच्या वतीने श्रावणी सोमवार उत्सव २०२६ निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पवित्र श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना फराळाचे वाटप करण्यात येत आहे.
जारकरवाडी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या भूगर्भात पुरातन महादेव मंदिर असून, श्रावण महिन्यात भगवान महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. दर सोमवारी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी खिचडी, केळी तसेच उपवासाचे लाडू आदी फराळाचे वाटप केले जात आहे.
हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या काळात भगवान शंकराच्या दर्शनासाठी तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने मंदिरांमध्ये येत असतात. या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या पुढाकारातून भाविकांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमासाठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी फराळ वाटपाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा तसेच श्रावणी सोमवार उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री विठ्ठल-रुक्मिणी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.





